जगद्गुरु तुकाराम

 ओलें मूळ भेदी खडकाचें अंग।
अभ्यासासी सांग कार्यसिद्धी॥
नोहे ऐसें काहीं नाहीं अवघड।
नाहीं कईवाड तोंच वरि॥
दोरें चिरा कापे पाडिला कांचणी।
अभ्यासें सेवनी विष पडे॥
तुका म्हणे कैचा बैंसण्याची ठाव।
जठरीं बाळा वाव एकाएकीं॥
अ. क्र. 902 गाथा

एखाद्या व्यक्तीला तत्कालीन सतराव्या शतकातील आधुनिक ज्ञानाबद्दल अनभिज्ञता असूनदेखील जगद्गुरु म्हणलं जातं;  याचं कारण शोधलं तर संत तुकाराम महाराजांचे अनेक अभंग आपल्या या कुत्सित बुद्धीला भेद देऊन त्यांचं माहात्म्य विषद करतं. त्यातीलच एक हा अभंग अगदी चार ओळीचा; पण, त्यातील अर्थ शोधला आणि तो फक्त शोधून उपयोग नाही तो अंगिकारला तर आयुष्याचं सोनं होऊन जाईल.
गावातील एखाद्या वाड्यावर भक्कम दगडावर आपल्याला छोटेसे रोपटे उगताना दिसते आणि हळू हळू ते एवढे मोठे होते की संपूर्ण दगडांची भिंत भेदून, हवा, पाणी, पोषकद्र्वांची कमतरता अशा अनेक अडचणींचा सामना करत उभं राहतं आणि फुलतं. अगदी अश्याच प्रकारे आपल्याला एखादे ध्येय आजच्या भाषेत GOAL साध्य करायचे असेल तर असाच रोज थोडा थोडा अभ्यास करून अनेक अडचणरूपी पाषाणांना भेदून, अनेक परिश्रमातून ते साध्य होऊ शकत हेच सांगण्याचा प्रयत्न संत तुकाराम महाराज या दोन ओळीतून करतात.

वरील गोष्टीला पूरक असे दृष्टांत देण्याचा प्रयत्न संत तुकाराम महाराज इतर ओळीत करतात. ते म्हणतात एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर फक्त आणि फक्त सातत्य आणि परिश्रम आपल्याला ते मिळवून देऊ शकतं आणि जगात अशी कोणतीच गोष्ट नाही जी अथक परिश्रम आणि सातत्याने केल्यावर साध्य होत नाही.
जसे आपण गावातील विहिरीवर बघतो की पाणी उपसायला बादली आणि त्याला एक दोर असतो. तसा दोरा/ सुतळी/ रस्सी बनते नाजूक कापूस अथवा नारळाच्या सालीपासून; पण सतत तो दोर बादलीच्या वजनामुळे विहिरीच्या पाषाणावर घासला जातो आणि तो त्या दगडाला देखील चीर पाडतो ते का ? तर सतत घासत राहिल्याने, कृतीच्या सातत्याने.
शेवटच उदाहरण गमतीशीर आहे, आईचे पोट किती छोटं असतं पण सतत थोडी थोडी वाढ करून नऊ महिन्यात बाळ त्याची जागा त्यात निर्माण करतच.
असा हा तुकाराम गाथा मधील एक अभंग आपल्याला एवढं काही शिकवून जातो की इतर अभंग अभ्यासले तर संत तुकाराम महाराजांना जगद्गुरु का म्हणावे याची प्रचिती येते.
असेच काही अभंग आपण कळत - नकळत ऐकत असतो, जसे
1) असाध्य ते साध्य करिता सायास |
कारण अभ्यास तुका म्हणे||

2) भले तरी देऊ कासेची लंगोटी|
नाठाळाच्या माथी हाणू काठी ||

हे आणि असे अनेक अभंग तुकोबारायांचे महात्म्य आपल्याला दर्शवते.

आयुष्यात आपण अनेक ध्येय ठरवतो काही साध्य होतात तर काही स्पर्धा असल्यामुळे साध्य करायला खूप अडचणी, त्रास सहन करावा लागतो. पण सातत्य ठेवले आणि अथक परिश्रम करत रोज थोडा थोडा अभ्यास ( Practice) केला तर जगातील असे कोणतीही ध्येये, गोष्टी नाहीत ज्या सातत्याने, परिश्रमाने साध्य होत नाहीत.
आज संत तुकाराम महाराज बीज निमित्त तुम्हां सर्वांना अथक परिश्रम आणि सातत्याने अभ्यास करण्यासाठी आणि अंतिमतः ध्येय साध्य करण्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा...

~ अक्षयवर्ण
( अक्षय नि. रा. कर्डिले )

Comments

Popular posts from this blog

छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी